लघुकथा : रूस्तुमा

        रातकिड्यांचा किर्रर्र आवाज चहूबाजूंनी सुरू होता. राञ बरीच चढली होती. अशा वेळी रूस्तूमाच्या घरातला टि. व्ही. तालासुरात भैरवी का गातोय. याचा राहुन राहुन दौलादा विचार करू लागला. एकाकी विकल दौलादा... रात असो कि दिस एकटेपणा माणसाला खायला उठते. हेच खरे ! अशा वेगवेगळ्या विचारात तो या अंगाहुन त्या अंगावर कड बदलत व्हता. माञ झोप काही येत नव्हती. अशा कडबदलीत तास दीडतास उलटून गेला. आता टि. व्ही. सुई $$ सुई $$ असा रेकू लागला. राहावलं नाही     त्याला. आपल्या खोपटाचा झोपाटा लावून तो रूस्तूमाच्या घराच्या दिशेने निघाला. रूस्तूमाच घर बर्‍यापैकी. घरात कुलर, पंखा वाजवीचाच आणि जुनाच चालू असलेला टि. व्ही. मनोरंजनाच साधन. तेवढाच काय तो बदल. विचारांच्या तंद्रीत तो रूस्तूमाच्या दारात कधी पोहचला. हे त्याच त्यालाच कळले नाही.

 'रूस्तूमा  $$ अरे ओ रूस्तूमा $$ '
त्यान आवाज दिला. राञीच्या त्या भेसूर किर्र काळोखात त्याचा आवाज त्यालाच भयाण भिसुर भासला. त्यानं पुन्हा आवाज दिला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यान दरवाजा ढकलला. दरवाजा कुई  $$ करीत उघडला गेला. समोरचं दृश्य भलतच जिवघेण त्याही पेक्षा अपार दुखद होतं. टि. व्ही. वरील कार्यक्रम संपल्याने टि. व्ही. पट्ट्या मारीत होता. पलंगाच्या आणि सोफ्याच्या मधोमध रूस्तूमाचा देह आडवा झाला होता. डोळे सताड उघडे. .हात पाण्याच्या मडक्याकडे झेपावलेले... हातातला ग्लास बोटाच् नि अंगठ्याच्या मधोमध फसलेला. .    
' जिव कव्हा गेला म्हणायचा? ' दौलादा स्वतःशीच पुटपुटला. तो तसाच मागे फिरला. शेजारी असलेल्या भास्कर - पाव्हंण्याला बोलवावं का? या विचारासरसी तो तिकडे वळला. त्याने आवाज दिला. आवाज तोंडातल्या तोंडातच राहीला. मग मात्र त्याने पुन्हा मोठ्या हिंमतीने आवाज दिला. तो काहीसा ओरडलाच जणू . ' भास्कर पाव्हणं ओ $$ भास्कर पाव्हणं ' टूक्की टाकून अफाट पसरलेल्या भास्कर पाव्हंण्याला चेव येईल तं काय? माञ त्याची बायको शांती दचकून उठली. बाहेर पाह्यती तं दौलादा. ' काय झालं मामंजी?  काहून वसकावलात अर्धा राच्चे?  अवं भास्करला उठीव... रूस्तूमा गेला की  $$
' काय म्हणता  $$ '
' अहो , उठा की, रूस्तूमाबाबाजी गेले हो $$ '
' जाव दे तुह्या मायमी.. झोपू दे मले. रातच बे रातच ऊठून राह्यली;  करदावला तो. ञासिकतेनं कड बदलतांना त्याला किलकिल्या डोळ्यातून नसेच्या धुंदीत दौलादा तेवढा दिसला. तसा तो ताटकन उठून बसला. नेमक काय झालय हे त्याच्या हळूहळू ध्यानात येऊ लागलं ' रूस्तूम आबा वारलेत की काय?  दौलादा... '
' अरे तवाचं तेच त् सांगायलो नं बाप्पा. तू तं कायच्या काय बरूळतूया..'
आता तिघांना तांडा रूस्तूमाच्या घराकडे निघाला. तो रूस्तूमाच्या उंबरठ्यांत आले अन् अकस्मात फट् आवाज होऊन टि. व्ही गपगार. . सर्वञ अंधार. समोर भयाण भिसुर काळोख.
' लाईन गेली म्हणायची ' दौलादा पुटपुटला.
' सिंगल फेज असून गेली का म्हणा ' शांती बोल्ली.
' अवं भयतान्यावानाचे फ्युज उडला असीन. लाईन त दिसती नं त्या शेजारच्या पकाभौच्या घरात.' भास्कर पाव्हंण्यानं बडबडत माचिस पेटवली.
' पाह्य दिवालगीरी असनं कुठतरी '
माचीसच्या पिवळसर उजेडात घर लख्ख पिवळे झाले. ज्योत मोठी होतहोत विझली सुध्दा... पुन्हा काडी पेटवून तो वस्संकन खेकसला.
' अवं ती काय तिथं कोनाड्यात  ' अस म्हणत तोच तिकडे झेपावला. ज्योत पेटलेली दिवालगीरी टि. व्हीवर ठेवत तो तसाच मटकन सोफ्यात बसला. माञ, दुसर्‍याच क्षणी दौलादाच्या साह्याने त्याने रूस्तूमाचा देह उचलला. बसत करत भिंतीला खुंटला.
' बसत होत नै कान्नु मढ ' दौलादा.
' जाऊन चार -पाच घंटे झाले असतीन नं दौलादा '
रूस्तूमाची डेडबाॅडी बसती करत भास्कर पाव्हंण्यानं सुस्कारा सोडला.
' आता कस करता?  फोनगिन करावं का?  पोर येतीन नव्ह ' उंबरठ्यांत उभी शांती एकदाची बोल्ली.
मग दिवालगीरीच्या मंद उजेडात या तिघांची चाललेली खडबड येकून एव्हाना आसपासचे चारचौघ जमा झाले. ' काय?  गेला की काय रूस्तूमा ' शिरपत आबा. शिरत आबा म्हणजे भोकरवाडीतल मोठ प्रस्त. तशी घर पाचपन्नासच. पण बरेच जण ' पोटासाठी जगदीशा.. ' गत पुण्या मुंबईत गेलेले. गावात काय ती मोजकीच मान्स. मान्स कमी असली म्हणजे आपुलकीला वाव. अभाव असला म्हणजे निभाव लागतो एकमेकांचा. किमानपक्षी विचारपूस तरी होते. ' होनं आबा. आता कस करावं जी ' दौलादा. ' कस म्हणजे? ' शिरपत आबा.  'पोरास्नी बोलवावं लागन मौतीसाठी. . पाणी धरायास्नी पोरं नको का? ' शांती भाबडेपणानं बोल्ली. ' जित्यापनी नाही पाजलं पाणी त्याले कोन्हं.. तोच आणायचा झारीनं बरडातल्या खडकीतलं पाणी डोस्क्यावर.. पार दम लागेस्तवर.. ' करूणा भाकल्या स्वरात दौलादा बोल्ला. त्याची बी तीच गत व्हती. गेल्यासाली असचं पाणी आणता आणता दौलादा खडकीच्या विहिरीवर पाय सटकून पडला.  तवा त्याचे दोन्ही टोंगळे फुटले.. ' मरतू का लेका $$ ' म्हणत सोबतचा रूस्तूमा खेकसला होता. जिवाभावाचा सखावाटला व्हता तवा रूस्तूमा. आता तं तोही गेला सोडुन. कह्याचे पो-ह नं कह्याचं काय? त्याला उपरती झाली.
              आता चढती राञ उतरणीला लागली व्हती. उत्तरेस शुक्राची चांदनी लख्ख दिसत व्हती. राञ जागून काढल्याने त्या सर्वांचे डोळे खुपत व्हते. राञीच मुलांना फोनवर कळवल व्हत. मोठा सुरेश येतो म्हणला. कदाचित निंघला असनं. लहाना झंप्या मात्र त्याची बायको आजारी है अन् दवाखान्यात अॅडमीट करायची म्हणत व्हता. अजाडता उजाडता सुरेश बायको मंदासह हजर झाला. त्याचा मुलगा ऋतीक बारीक नजरेनं सगळ बगत व्हता. नाकळत्या वयातील लेकरं अबोध बोलकी असतात. तितकीच नादरही. रूस्तूमाचा त्याला तेवढा लळा. नातू ना तो. सुरेशनं मर्तीकाच सर्व सामान सोबत आणलं होतं. धोतराच नव पान दौलादाच्या हातात देत तो माडासाठी परसातला येळू फोडू लागला.
        माड बांधता बांधता दौलादाचं विचारचक्र गतीमान झाल. सुटला बिचारा एकदाचा रूस्तूमा.. तो मनाशीच पुटपुटला.  त्याचा तं सुरेश का होईना आला. आपला नामा येईल का नाही.. आला बी तं काय कामाचा. मिन्साच आयुष्य कोलदांड्यागत नसाव भो. आता पिकल पान कधीतरी गळणारच. पिकल्या देठाचं गळत सुख फळासारख आपल्या कुठ है नशीबात.  परिस्थितीचं नासक फळ हे आपून...
               पिराजीच्या डफड्याच्या आवाजानं दौलादा भानावर आला. प्रेतयात्रा स्मशानाकडे निघाली व्हती. मावळतीला सूर्याची रक्तीम लाली पसरली होती. दौलादाच्या मनात चिंतेच काहूर समोरच्या रूस्तूमाच्या मढ्यागत ढणाणा पेटलं व्हतं

               
             -  सत्य प्रयागबाई कुटे.
                ' शब्दमळा ' चिखली
                जि. बुलडाणा  443201
               भ्र. 9881310258
      Shabdankan58@gmail.com.

(पुर्व प्रसिद्ध : परिवर्तनाचा वाटसरू दिवाळी, २०१८) 

Comments